मुंबई : सरते वर्षे भाजपच्या अनेक निष्ठावंतांसाठी धक्कादायक ठरले. गेल्या दहा वर्षांपासून नगरसेवक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अनेकांच्या स्वप्नांचा एका क्षणात चुराडा झाला. मग त्यांच्या दु:खाला पारावार उरला नाही. ज्या साहेबांसाठी पायाला भिंगरी लावून फिरलो. कार्यकर्ते जमा केले. पक्षाच्या सतरंज्यापासून ते मंडप टाकण्याची कामं केली. पक्षासाठी खस्ता खाल्या. अनेक कार्यक्रम राबवले. त्याला मंत्रिमहोदय उद्धघटनासाठी आले पण उमेदवारी कापली गेल्यानंतर हेच साहेब फोन सुद्धा घेत नसल्याने निष्ठावंतांनी टाहो फोडला. कुणाला भोवळ आली, कुणाला भावनावेग आवरता आला नाही. या सर्व नाराजीची दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील बंडखोरांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संपर्क करण्यात येत आहे. पक्षातील निष्ठावंतांशी स्वतः मुख्यमंत्री बोलले आहेत.निवडणुकीत माघार घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा अनेक अपक्षांसोबत संवाद झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.बंडखोरी शमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिल्याचीही माहिती समोर येत आहे. तर काही बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर सोपविण्यात आल्याचेही समजते.
स्थानिक बंडखोरी वेळीच रोखण्यासाठी स्थानिक नेते आता अनेक बंडखोरांच्या घरी जाऊन त्यांना समजावून सांगत असल्याचे समजते. या नेत्यांनी त्यांना भाजपची पक्ष शिस्तसह संयमाची आठवण करुन दिल्याचे समजते. त्यांच्या कुटुंबियांशी ही बडी नेते संवाद साधत आहेत. त्यातील काहींनी तर आपल्याला किती वर्षानंतर पक्षाने न्याय दिला याची उजळणी करत आहेत. बंडखोरांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.